प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील मिलिट्री विनायक मंदिरच्या मागे मुख्य रस्त्यावर भगदाड पडले आहे. मंदिर परिसरातील रस्ताही खराब झाल्याने वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले असून, भगदाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम व्यवस्थित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मुख्य मार्गावर भगदाड पडल्याने वाहने अडकण्याचे प्रकार सुरू होते. या ठिकाणी डांबरीकरण करण्यापूर्वी भगदाड पडले होते. पण रस्त्याच्या डांबरीकरणावेळी माती व दगड घालून भगदाड बुजविण्यात आले होते. मात्र पावसाळय़ानंतर या ठिकाणी पुन्हा भगदाड पडले आहे. सदर खड्डा वाहनधारकांना धोकादायक बनल्याने येथील नागरिकांनी टायर ठेवले होते. बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. मात्र ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील बॅरिकेड्स नेण्यात आल्याने रस्ता खुला झाल्याने हा खड्डा धोकादायक बनला होता. लहान व दुचाकी वाहने यामध्ये अडकण्याचे प्रकार घडल्याने परिसरातील रिक्षाचालक आणि नागरिकांनी खड्डय़ामध्ये झाडाची फांदी लावली होती. नागरिकांच्या निदर्शनास येण्यासाठी आणि धोका टाळण्यासाठी टायरही ठेवण्यात आले होते. याबाबत दैनिक तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यामुळे वृत्ताची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी भगदाड दुरुस्त करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. मंदिर शेजारी निर्माण झालेले खड्डे डांबर घालून बुजविण्यात आले आहेत. रविवारी सकाळपासून येथील भगदाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीने खड्डा खोदून सदर ठिकाणी माती घालण्याचे काम व आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या.
यापूर्वीही भगदाड बुजविण्यात आले होते. पण पावसाळय़ानंतर पुन्हा खड्डा पडला होता. सदर ठिकाणी गटार असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्याची गरज आहे. माती घालण्यात आल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा भगदाड पडते. प्रत्येक वेळी दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.