आदी नलवडे मालिकावीर, लाभा वेर्णेकर सामनावीर, विजया अकदमी- एमसीसीसी संघांना संयुक्त तिसरे स्थान
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
तेजस कडाडीची भेदक गोलंदाजी आणि आशुतोष हिरेमठ व लाभा वेर्णेकर यांच्या तडफदार फलंदाजीच्या जोरावर बेळगाव स्पोर्ट्स क्लब ए संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघांचा अंतिम सामन्यात 8 गडय़ांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला. आदी नलवडे याला मालिकावीर तर लाभा वेर्णेकर याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. विजया अकादमी व एमसीसीसी संघाला संयुक्तपणे तिसरा क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना संघाने 24.5 षटकात सर्व बाद 112 धावा केल्या. त्यात आदी नलवडेने 1 षटकार, 3 चौकारासह 45 धावा केल्या. अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे तेजस कडाडीने 22 धावात 3 तर अभिनव चव्हाण व ऋतुराज पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 17.4 षटकात 2 बाद 113 धावा जमवित 8 गडय़ांनी विजय मिळविला. त्यात आशुतोष हिरेमठने 9 चौकारासह 50 धावा करून अर्धशतक झळकविले. त्याला लाभा वेर्णेकरने 5 चौकारासह 44 धावा करून सुरेख साथ दिली. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे आदी नलवडे व साईराज साळुंखे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात एमसीसीसी ए संघाने 19.2 षटकात 6 बाद 89 धावा केल्या होत्या, त्याचवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त तिसरे स्थान देण्यात आले. कृष्णा मेणसे व मोहिद सय्यद यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. विजयातर्फे साईश शिरोडकरने 22 धावांत 3, धृवनक पाटील व नवीन बेकवाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते आनंद सोमण्णाचे, परशराम पाटील, मिलिंद चव्हाण, गौस हाजी यांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स, उपविजेत्या अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना, तिसऱया क्रमांकाचे संयुक्त विजेते विजया अकादमी व एमसीसीसी ए संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सामनावीर लाभा वेर्णेकर (बीएससी), उत्कृष्ट फलंदाज आशुतोष हिरेमठ (बीएससी), उत्कृष्ट गोलंदाज मोहिद सय्यद (एमसीसी), छाप पाडणारा खेळाडू मलिक मुल्ला (एमसीसी), आदी नलवडे (अर्जुन स्पोर्ट्स) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी रवी कणबर्गी, ईश्वर इटगी, शहाबाज पठाण तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल गवी यांनी विशेष परिश्रम घेतले.