शिबिरार्थीना मिळणार लाभ, भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड 19 च्या संसर्गामुळे संपूर्ण जगाला धास्ती लागलेली असताना कोणत्याही क्रीडाप्रकारांसाठी न झालेली गोष्ट भारतीय बॉक्सर्स व त्यांच्या प्रशिक्षकांच्या वाटय़ाला आली आहे. लॉकडाऊननंतर प्रशिक्षण, सराव शिबिरात दाखल होणारे सर्व मुष्टियोद्धे, प्रशिक्षक व साहाय्यक स्टाफ यांना आता आरोग्य विमा सुरक्षाकवच मिळणार आहे. तसा निर्णय भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने घेतला आहे.
राष्ट्रीय शिबिरात असताना उपचार करण्यासाठी हे खास विमा कवच देण्यात येणार आहे. याशिवाय शिबिरात असणाऱया इतरांनाही नियमानुसार तातडीचे वैद्यकीय उपाय आणि अपघात यासाठी विमा कवच दिले जाणार आहे. भारतीय बॉक्सिंग फेरडेशनने राष्ट्रीय शिबिरासाठी मार्गदर्शक सूची (एसओपी) तयार करून त्याची घोषणा केली आहे. कोव्हिड 19 साठी खेळाडूंना विमा सुरक्षा देणारी बीएफआय ही पहिली राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन बनली आहे. आयआरडीएच्या दिशानिर्देशानुसार ही विमा सुरक्षा त्यांना देण्यात येणार आहे.
‘शिबिरात दाखल झालेल्या बॉक्सर्स व प्रशिक्षण स्टाफला 5 लाख रुपयाची मूलभूत विमा सुरक्षा दिली जाईल. मूळ पॉलिसीच्या 50 ते 75 टक्के (2.5 ते 3.5 लाख रुपये) त्याची टॉपअप रक्कम असेल. शिबिराची सुरुवात झाल्यानंतर लगेचच ही सुविधा लागू केली जाणार आहे,’ असे बीएफआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. मार्गदर्शक सूचीमध्ये विमा सुरक्षासह ट्रेनिंगच्या वेळी पाळावयाच्या सावधगिरीच्या आणि शिष्टाचाराच्या काही अटींची यादीही बीएफआयने जाहीर केली आहे. ट्रेनिंगसाठी बॉक्सर्सच्या तीन-चार जणांचा लहान गट तयार करून ठरावीक वेळेतच त्यांनी सराव करायचा असून कठोर सराव करणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक व स्टाफची प्रवेशावेळी चाचणी घेतली जाईल आणि चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारन्टाईनमध्ये रहावे लागणार असल्याचे या सूचीत सांगण्यात आले आहे.