वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थायलंडमधील फुकेत येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या सुमितने 75 किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठली आहे.
पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या सुमितने उपांत्यपूर्व लढतीत कझाकच्या नुर्सीतोव्हवर पूर्ण वर्चस्व राखत 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा भारताचा तो चौथा बॉक्सर आहे. याआधी मोनिका (48 किलो), आशिष कुमार (81 किलो), मनीषा (57 किलो) यांनीही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे. गौरव चौहानचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. 91 किलो वजन गटात त्याला कझाकच्या 2018 चा युवा ऑलिम्पिक चॅम्पियन ऐबेक ओरलबेकडून 1-4 अशा गुणफरकाने पराभव स्वीकारावा लागला.
बुधवारी भारताचे सहा मुष्टियोद्धे रिंगणात खेळताना दिसतील. भाग्यवती कचारी (75 किलो), अमित पांघल (52 किलो), रोहित मोर (57 किलो) उपांत्यपूर्व फेरीत खेळतील तर गोविंद सहानी (48 किलो), वरिंदर सिंग (60 किलो), आशिष कुमार (81 किलो) यांच्या उपांत्य लढती होतील. या स्पर्धेत आशिया, युरोप, ओशेनिया, आफ्रिका खंडातील 130 बॉक्सर्सनी भाग घेतला असून त्यात 74 पुरुष व 56 महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेत सुवर्ण विजेत्याला 2000 अमेरिकन डॉलर्स, रौप्य व कांस्यविजेत्याला 1000 व 500 डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. 2019 मध्ये झालेल्या मागील स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्यसह एकूण 8 पदके मिळविली होती.