ऑनलाईन टीम / मुंबई :
मंजिल, कर्मयोगी, बेगुनाह, राजतिलक यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे निर्माते अनिल सूरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. सूरी यांचे भाऊ राजीव सूरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मागील काही दिवसांपासून सूरी यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यातच 2 जून रोजी त्यांना अचानक ताप आला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यावेळी मुंबईतील लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयात सूरी यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला.
मोठ्या रुग्णालयात बेड न मिळाल्याने त्यांना बुधवारी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, त्यांनी उपचाराला दाद दिली नाही. गुरुवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.