ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावादावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज भारत-चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे.
चीनच्या ताब्यातील मोल्डो हट येथे ही बैठक होणार आहे. १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन या बैठकीत सहभागी होतील.
भारत आणि चीन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी स्थानिक आणि सर्वोच्च पातळीवरील कमांडर यांच्यात 12 वेळा चर्चा झाल्या. मात्र, त्या चर्चा निष्फळ ठरल्या. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सचिव स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजच्या बैठकीची चर्चा झाली. त्यानुसार आज दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी या वादावर तोडगा काढणार आहेत.