जानवलीच्या शशिकांत राणेबुवांकडून हरिनामाबरोबरच दातृत्वही
कणकवली:
‘कोरोना’मुळे भजनी मंडळांना ‘ग्रुप’ने भजन करण्यास शासनाने परवानगी नाकारल्यावर गणेशभक्तांचे घर गाठत फक्त एकटय़ानेच, तेही कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय भजन करणारे जानवली येथील भालचंद्र बाबा भजन मंडळाचे बुवा शशिकांत राणे यांनी अनंत चतुर्दशीदिनी अनोखा उपक्रम राबविला. एकीकडे राणेबुवा विनामोबदला भजन करत होते, तरीही गणेश भक्तांकडून त्यांना प्रेमापोटी मानधन दिले जात होते. पण, बुवांनी त्याच मानधनातून जानवली गावातील एका गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करीत, हरिनामासह दातृत्वाचाही मार्गही दाखविला आहे.
‘कोरोना’मुळे भजनाला परवानगी नसली, तरी आपल्यासारखा ईश्वरी नामस्मरणात रमणारा माणूस भजनापासून दूर राहू शकत नाही, याची जाणीव असलेल्या राणे बुवांनी गणेशोत्सव काळात कित्येक गणेश भक्तांच्या घरी जात फक्त एकटय़ानेच कधी हातपेटी, तर कधी मृदुंगाच्या साथीने भजन केले. भजनातून नागरिकांचे प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. अनेक ठिकाणी त्यांना गणेशभक्तांकडून प्रेमाने मानधन दिले गेले. मात्र, घरोघरी भजन सादर करताना मोबदल्याची अपेक्षा नसलेल्या राणे बुवांनी याच मानधनाचा चांगला उपयोग करायचे ठरविले. आणखीनही काहींना मदत करायची असल्याचे त्यांनी सांगितले. ही मदत करतेवेळी राणेबुवा यांच्यासमवेत पांडुरंग राणे, विजय राणे, राजू राणे, उत्तम परब, सत्यवान राणे आदी उपस्थित होते.