उपमुख्यमंत्रीचंद्रकांतकवळेकरयांचेआवाहन
प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
मजबूत कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे. शिबिरातून त्यांना मिळणाऱया सखोल माहितीमुळे कार्यकर्त्यांच्या विचारांची पातळी, ताकद, मनोबल वाढते. शिबिरातून मिळणारे मार्गदर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी लोकांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी फातर्पा येथे बोलताना केले. केपे मतदारसंघ भाजप कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सुरुवातीला त्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. या शिबिरामुळे कार्यकर्त्यांना पक्षीय धोरण पुढे नेता येईल तसेच पक्षावर व सरकारवर विरोधकांकडून होणारी अनाठायी टीका व अफवांपासून लोकांना सावध करण्याचे वैचारिक बळ मिळेल. पक्षाची ध्येय-धोरणे पुढे नेण्याची चोख कामगिरी कार्यकर्त्यांनी बजवावी, असे आवाहन कवळेकर यांनी केले. शनिवारी सुरू झालेले हे शिबिर दोन दिवस चालणार आहे. उद्घाटनप्रसंगी माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप व बार्से जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, बाळ्ळी जिल्हा पंचायत मतदारसंघ उमेदवार संजना संजय वेळीप, अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, सचिव खुशाली वेळीप, उपाध्यक्ष संदीप फळदेसाई उपस्थित होते.
कवळेकर पुढे म्हणाले की, दोन दिवसांत अनेक विषयांवर पक्षाचे ज्ये÷ नेते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यकर्ता शिबिर केपेप्रमाणे चाळीसही मतदारसंघांत घेण्यात येत आहे. शिबिरांची सुरुवात केपे मतदारसंघातून करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले पाहिजे हे पक्षाचे धोरण आहे. या प्रशिक्षणामुळे विरोधकांच्या अफवांना सहजासहजी कार्यकर्ते बळी पडणार नाहीत व जनतेला वेळीच सावधही करतील.
निवडणुकांत चोख कामगिरी बजवावी
सरकार अंत्योदय धोरणानुसार राबत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याचे खंबीर नेतृत्व गोव्याला लाभले आहे सरकार कसल्याचा भेदभावाला थारा देत नाही. तळागाळातील लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यामुळेच सरकारने आता नवा उपक्रम म्हणून सरकारी अधिकाऱयांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे व यापुढे ते 191 अधिकारी पंचायत पातळीवर पोहोचतील. याप्रसंगी लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याची संधी कार्यकर्त्यांना अशा शिबिरांमुळे लाभणार आहे. पुढील दिवसांत पालिका व जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत भाजप उमेदवारांकरिता चोख कामगिरी बजावण्याची संधी आहे, असे कवळेकर म्हणाले.
मुख्यमंत्री, अन्य नेत्यांकडून मार्गदर्शन
उद्घाटनानंतरच्या सत्रात सावईकर यांनी भारतीय राजकारण, भाजप पक्ष व आमची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या सत्रात ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर यांनी विचार परिवार, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी भारतीय वैचारिक मुख्य प्रवाह व आमची विचारधारा, सरचिटणीस दामोदर नाईक यांनी अंत्योदय धोरण पुढे नेण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील भाजप सरकार व राज्याची राजकीय पार्श्वभूमी आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. आज रविवारी वीजमंत्री नीलेश काब्राल, नागराज प्रभू, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तनावडे व महामंत्री सतीश धोंड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केपे मंडळाचे माजी अध्यक्ष राजू सुखटणकर यांनी केले व संजय वेळीप यांनी आभार मानले.