मेरठमध्ये घडला प्रकार : अनेक जण जखमी
मेरठ जिल्हय़ातील सिवालखास मतदारसंघातील दबथुवा गावात भाजप उमेदवाराकडून सुरू असलेल्या जनसंपर्कादरम्यान दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट यांच्या ताफ्यावर शनिवारी याच गावात हल्ला झाला.
बबिता फोगट घरोघरी प्रचार करत असताना रालोद समर्थकांनी तेथे हातात काठय़ा घेऊन धाव घेत घोषणाबाजी सुरु केली. तसेच त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामुळे ताफ्यात सामील अनेक जण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी सरधना येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात येणार आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याचबरोबर भाजप किसान मोर्चाचे नेते शनिवारी गावात पोहोचले असता रालोद समर्थकांनी विरोध करत घोषणाबाजी केली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.