गोल नोंदवणाऱयांत आकाशदीप सिंगचाही समावेश
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम, द.आफ्रिका
भारताच्या पुरुष हॉकी संघाने एफआयएच हॉकी प्रो लीगची विजयाने सुरुवात करताना पहिल्या सामन्यात फ्रान्सचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. अनुभवी आकाशदीप सिंगचा हा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
या वर्षातील पहिला विजय नोंदवणाऱया मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातर्फे हरमनप्रीत सिंग (21 वे मिनिट), वरुण कुमार (24), शमशेर सिंग (28), मनदीप सिंग (32), आकाशदीप सिंग (41) यांनी गोल नोंदवले. भारताने या सामन्यात प्रारंभापासूनच आक्रमणाला सुरुवात करीत फ्रान्सच्या बचावफळीला सतत दडपणाखाली ठेवले. पहिला काही मिनिटाला भारताला पहिली संधी मिळाली. हरमनप्रीतने मैदानाच्या मध्यावरून निलकांताकडे पास पुरविला होता. पण त्याने सर्कलच्या मध्यातून मारलेली फ्लिक गोलपोस्टच्या बारवरून बाहेर गेली. काही मिनिटानंतर भारताला आणखी एक संधी मिळाली. पण यावेळी फ्रान्सच्या बचावफळीने त्यांची संधी वाया घालवली. दहा मिनिटाचा खेळ झाल्यानंतर भारताने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पदार्पणवीर जुगराजने त्यावर प्रयत्न केले. पण फ्रान्सच्या गोलरक्षकाने त्याला यश मिळू दिले नाही. त्यामुळे पहिले सत्र कोरेच राहिले.
दुसऱया सत्रात भारतीय संघ जास्त धोकादायक बनला. आघाडी फळीने जोरदार घुसखोरी करीत प्रतिस्पर्ध्यांच्या सर्कलपर्यंत मुसंडी मारली आणि 21 व्या मिनिटाला मिळालेल्या तिसऱया पेनल्टी कॉर्नवर उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल नोंदवला. दोनच मिनिटानंतर आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर वरुण कुमारने ही आघाडी 2-0 अशी केली. फ्रान्सने प्रयत्न करून 28 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारतीय बचावफळीने तो फोल ठरविला. प्रतिआक्रमणात निलकांता शर्माने आगेकूच करीत शमशेर सिंगकडे पास पुरविला. त्यावर त्याने संघाचा तिसरा गोल नोंदवला. तिसऱया सत्रातही भारताचेच वर्चस्व राहिले. या सत्रातील दुसऱयाच मिनिटाला मनदीपने संघाला चौथे यश मिळवून दिले.
तिसऱया सत्राच्या उत्तरार्धात फ्रान्सने थोडाफार सुधारित खेळ केला. मात्र त्यांच्या कर्णधाराने केलेल्या चुकीचा लाभ उठवत 200 व्या सामन्यात खेळणाऱया आकाशदीप सिंगने शानदार गोल केला. 41 व्या मिनिटाला त्याने हा गोल नोंदवला. अखेरच्या सत्रात फ्रान्सने गोल करण्यासाठी आक्रमण धोरण स्वीकारले, पण गोलरक्षक कृशन पाठकने अप्रतिम गोलरक्षण करून त्यांना यश मिळू दिले नाही. नंतर भारताने वेग कमी करीत खेळ केला आणि 5-0 असा विजय निश्चित केला.