वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
विश्वचषक हॉकी स्पर्धेतील शनिवारी झालेल्या नववे व दहावे स्थान ठरविण्यासाठीच्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला 5-2 अशा फरकाने चीत करून संयुक्तपणे नववे स्थान पटकावले. न्यूझीलंडविरुद्ध हार पत्करावी लागल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठणे शक्य न झालेल्या भारताने सुरुवातीपासून या सामन्यात वर्चस्व गाजविले आणि पाचव्या मिनिटाला अभिषेकने गोल करून आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 12 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून भारताचे आघाडी वाढवली.
दुसऱया सत्रात वरुण तसेच हरमनप्रीत यांना आपल्या ड्रग फ्लिकचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही, तर जर्मनप्रीत सिंगला जवळून गोल नोंदविता आला नाही. त्यामुळे दुसऱया सत्राच्या अखेरीस आघाडी वाढू शकली नाही. तिसऱया सत्रात 45 व्या मिनिटाला समशेर सिंगने गोल करून आघाडी 3-0 वर नेली, तर 49 व्या मिनिटाला आकाशदीपने चौथा गोल केल्यानंतर लगेच दक्षिण आफ्रिकेच्या सामकेलो माविंबिने दक्षिण आफ्रिकेचा पहिला गोल करून पिछाडी कमी केली.
पुढच्याच मिनिटाला दक्षिण आफ्रिकी गोलरक्षकाने हर्मनप्रीतचा पेनल्टी कॉर्नरवरील चांगला प्रयत्न उधळून लावला, 53 व्या मिनिटाला वरुणने हाणलेला फटका दिशाहीन ठरला, तर 56 व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगचा शक्तिशाली फटका गोलरक्षकाने अडविण्यात यश मिळविले. सुखजित सिंगने 49 व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल नोंदविल्यानंतर शेवटच्या मिनिटाला कासिम मुस्तफाने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोल केला.