वृत्तसंस्था /पल्लीकेले
कर्णधार हरमनप्रित कौर आणि पूजा वस्त्रकार यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुरुवारी येथे झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारतीय महिला संघाने यजमान लंकेचा 39 धावांनी दणदणीत पराभव करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 3-0 असा एकतर्फी विजय मिळविला. कर्णधार हरमनप्रित कौरला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला.
या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 9 बाद 255 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव 47.3 षटकात 216 धावात आटोपला.
भारताच्या डावामध्ये कर्णधार कौरने 88 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 75, शफाली वर्माने 50 चेंडूत 5 चौकारांसह 49, यास्तिका भाटियाने 38 चेंडूत 5 चौकारांसह 30, पूजा वस्त्रकारने 65 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 56 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 5 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. भारताची एक वेळ स्थिती 26.2 षटकात 6 बाद 124 अशी होती. पण त्यानंतर हरमनप्रित कौर आणि पूजा वस्त्रकार या जोडीने 7 व्या गडय़ासाठी 97 धावांची भागिदारी केल्याने भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. लंकेतर्फे इनोका रणवीरा, रश्मी सिल्वा आणि चमारी अट्टापटू यांनी प्रत्येकी 2 तसेच कांचना, रणसिंगे व दिलहरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये कर्णधार चमारी अट्टापटूने 41 चेंडूत 8 चौकारांसह 44, निलाक्षी डिसिल्वाने 59 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 48, हसिनी परेराने 57 चेंडूत 3 चौकारांसह 39, कविशा दिलहारीने 12, हर्षिता समरविक्रमाने 28 चेंडूत 1 चौकारासह 22, रश्मी सिल्वाने 4 चौकारांसह 18 तर रणविराने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाडने 36 धावात 3, पूजा वस्त्रकार 33 धावात 2, मेघना सिंगने 32 धावात 2 तर दीप्ती शर्मा, हरमनप्रित कौर आणि हरलीन देवोल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतीय महिला क्रिकेट संघाने यापूर्वी लंकेविरुद्ध 2013, 2015 आणि 2018 साली वन डे मालिका जिंकल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
भारत- 50 षटकात 9 बाद 255 (हरमनप्रित कौर 75, पूजा वस्त्रकार नाबाद 56, शफाली वर्मा 49, यास्तिका भाटिया 30, रणविरा, रश्मी सिल्वा, चमारी अट्टापटू प्रत्येकी 2 बळी, कांचना, रणसिंगे आणि दिलहारी प्रत्येकी 1 बळी), लंका- 47.3 षटकात सर्वबाद 216 (निलाक्षी डिसिल्वा नाबाद 48, चमारी अट्टापटू 44, हसिनी परेरा 39, दिलहारी 12, समरविक्रमा 22, रश्मी सिल्वा 18, रणविरा 10, राजेश्वरी गायकवाड 3-36, पूजा वस्त्रकार 2-33, मेघना सिंग 2-32, दीप्ती शर्मा, हरमनप्रित कौर आणि देवोल प्रत्येकी 1 बळी).