नवी दिल्ली
अलिकडे भारतीय महिला फुटबॉल संघ तुर्कीच्या दौऱयावर असून अलेनिया येथे झालेल्या रशियाविरूद्धच्या सामन्यात भारताला 8-0 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. दरम्यान या सामन्यात भारतीय महिला संघाची कामगिरी समाधानकारक झाली असल्याचे मत प्रमुख प्रशिक्षिक मेमॉल रॉकी यांनी व्यक्त केल्या. भारतीय महिला फुटबॉल संघाला या दौऱयात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळाला असून पुढील सामन्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास रॉकी यांनी व्यक्त केला. भारत आणि रशिया यांच्यातील अलेनिया येथे झालेल्या सामन्यात रशियाने भारतावर 8-0 अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात रशियातर्फे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात प्रत्येकी चार गोल नोंदविले गेले. आता या दौऱयात भारतीय फुटबॉल संघाचा मित्रत्वाचा सामना युक्रेनबरोबर मंगळवारी होणार आहे. रशियाविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून काही चुका झाल्या पण पण त्या युवा व अननुभवी आहेत. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय संघाबरोबर खेळण्याची संधी उपलब्ध झाली, हे महत्त्वाचे आहे, असेही रॉकी म्हणाल्या.