वृत्तसंस्था/ दुबई
शनिवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या फुटबॉल सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने संयुक्त अरब अमिरात संघाचा 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
शनिवारच्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघातर्फे मनिषाने 20 व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. 27 व्या मिनिटाला प्यारी झाझाने भारताचा दुसरा, स्वीटी देवीने 41 व्या मिनिटाला भारताचा तिसरा आणि अंजु तमंगने 75 व्या मिनिटाला भारताचा चौथा गोल केला. फिफाच्या मानांकनात सध्या भारत 57 व्या तर संयुक्त अरब अमिरातचा संघ 100 व्या स्थानावर आहे. 2021 च्या फुटबॉल हंगामातील भारतीय महिला संघाचा हा पहिला विजय आहे. आता भारतीय महिला फुटबॉल संघाचा दुसरा मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय सामना सोमवारी येथे टय़ुनिशिया बरोबर होणार आहे.