वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत एका फार्मास्युटिकल कंपनीच्या भारतीय वंशाच्या सीईओची कथितपणे एका इसमाने दरोडय़ाच्या प्रयत्नावेळी हत्या केली आहे. भरतीय वंशाचे सीईओ कॅसिनोमधून सुमारे 10 हजार डॉलर्स जिंकल्यावर स्वतःच्या घरी परतले होते. ऑरेक्स लॅबोरेट्रीजचे प्रमुख श्री रंगा अरवापल्ली असे मृत्यू झालेल्या सीईओचे नाव आहे.
कॅसिनोत अरवापल्ली यांनी मोठय़ा प्रमाणात पैसे जिंकल्याचे हल्लेखोर जेकाई रीड-जॉनने पाहिले होते. यानंतर त्याने लूट करण्याच्या उद्देशाने अरवापल्ली यांचा पाठलाग करत प्लेन्सबोरो येथील त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. तेथे लुटीला विरोध करणाऱया अरवापल्ली यांची जेकाईने गोळय़ा घालून हत्या केली आहे.
पेन्सिल्वेनियात पोलिसांनी आरोपी रीड-जॉनला अटक केली आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी आरोपीला न्यू जर्सी येथे पाठविण्याची तयारी केली जात आहे. अमेरिकेत एखाद्या व्यक्तीला अन्य प्रांतातील गुन्हय़ांसाठी अटक केली जाते, तेव्हा अधिकाऱयांना तपास किंवा खटल्याच्या अधिकारक्षेत्रात आणण्यासाठी न्यायालयात प्रत्यार्पण प्रक्रियेतून जावे लागते.
अरावपल्ली यांच्या घरात प्रवेश केल्यावर जॉन-रीडने मागील दरवाजा तोडला होता. तर घरात अरावपल्ली यांच्या पत्नी आणि मुलगी वरच्या मजल्यावर झोपल्या होत्या.