दुबई / वृत्तसंस्था
युवा भारतीय फुटबॉल संघ आज (गुरुवार दि. 25) ओमानविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असून अनुभवी कर्णधार सुनील छेत्रीची संघाला प्रकर्षाने उणीव जाणवू शकते. कोव्हिड-19 मुळे सक्तीच्या वर्षभराच्या ब्रेकनंतर भारतीय फुटबॉल संघासाठी हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. फिफा मानांकन यादीत ओमानचा संघ 81 व्या स्थानी तर भारत 104 व्या स्थानी आहे.
सुनील छेत्री कोरोनाबाधित असून सलग दोन आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण लढतीत तो खेळणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ सोमवारी संयुक्त अरब अमिरातविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंचे सरासरी वय 24 इतके असून यातील बहुतांशी खेळाडूंनी अलीकडेच संपन्न झालेल्या आयएसएल स्पर्धेत विविध प्रँचायजींतर्फे भरीव कामगिरी केली आहे.