मृतांची संख्या दोनवर, काकती पोलीस स्थानकात एफआयआर
पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टीजवळ भरधाव कार झाडाला आदळून गंभीर जखमी झालेल्या आणखी एका तरुणाचा सोमवारी सकाळी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
ओंकार नारायण बाळेकुंद्री (वय 21, रा. महात्माफुले रोड, शहापूर) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी भुतरामहट्टी जवळ केए 22 झेड 2153 क्रमांकाची कार झाडाला आदळून हा अपघात घडला होता. अभिषेक सुभाष धोंगडी (वय 21, रा. महात्माफुले रोड, शहापूर) हा तरुण ठार झाला होता. तर आणखी चौघे जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक बनली होती. सोमवारी सकाळी ओंकारचा मृत्यू झाला आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.