जिनेव्हा / वृत्तसंस्था
चॅम्पियन्स लीगमधील दोन वर्षांची बंदी रद्द करवून घेण्यात मँचेस्टर सिटीच्या कायदेशीर लढय़ाला सोमवारी यश मिळाले. त्रिसदस्यीय क्रीडा लवादाने मँचेस्टर सिटीचा युक्तिवाद मान्य करत सदर बंदी रद्द केली. मात्र, यावेळी त्यांच्यावर 10 दशलक्ष युरो दंड ठोठावला. युफाने मँचेस्टर सिटीवर सदर बंदी लादली होती. क्रीडा लवाद आपल्या निर्णयाची प्रत येत्या काही दिवसात सादर करणार असून त्यात त्यांना युफाचे कोणते मुद्दे पटले नाहीत, हे स्पष्ट होईल. चॅम्पियन्स लीग स्पर्धा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. या निर्णयाविरुद्ध युफा अजूनही स्वित्झर्लंडमधील सर्वोच्च लवादाकडे दाद मागू शकते. पण, तेथे यश मिळण्याची शक्यता धुसर असेल, असे इतिहासातील काही उदाहरणावरुन दिसून आले आहे.