सजीव सृष्टीची माता असणाऱया पृथ्वीला भावंड नाही याची मोठी खंत माणसाला आहे. भावंड नाही याचा अर्थ असा की, पृथ्वीसारखी जीवसृष्टी सूर्यमालेतल्याच काय, पण अन्य कोणत्याही ग्रहावर असल्याचे निश्चितपणे सांगता येईल, असा पुरावा मिळालेला नाही. तथापि, पृथ्वीच्याच शेजारच्या कक्षेत असणारा मंगळ ही उणीव भरून काढेल असे संशोधकांना वाटते. निदान थोडी धुगधुगी तरी दिसते.
कारण, सजीव सृष्टीचा पाया पाणी हा आहे. (म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ असा प्रतिशब्दही आहे). हेच पाणी बाष्पस्वरूपात मंगळावर आढळले आहे. थोडक्यात सांगायचे तर मंगळ ‘वाफाळलेला’ आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या तसेच रशियन स्पेस एजन्सीच्या संशोधनातून ही बाब समोर आली. 2016 मध्ये मंगळाच्या कक्षेत या संस्थांनी सोडलेल्या उपग्रहांनी ही विश्वासार्ह माहिती पाठविली आहे. आतापर्यंत मंगळावरील पाणी केवळ हिमाच्या स्वरूपात आहे असा समज होता. पण तेथे काही प्रमाणात पाण्याची वाफही आहे हे नुकतेच समजले आहे. परिणामी, तेथे सजीव सृष्टी फुलण्याची आणि फळण्याची अंधूक आशा संशोधक व्यक्त करतात. अर्थात, सध्यातरी हे केवळ ‘विशफुल थिंकींग’ आहे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. कारण मंगळावर जीवन शोधणे म्हणजे वाळवंटात दडलेली सुयी अंधारात शोधण्यासारखे आहे. पण मानव आशावादी असतो, एवढे तरी यावरून सिद्ध होते.