वार्ताहर/ माशेल
भोम येथील धाडो नायनाडो शेतकरी संघटनेने स्थानिक आमदार तथा कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची भेट घेऊन शेतात कापणी व मळणीसाठी मशिन नेता यावे यासाठी वाट तयार करून देण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोमकर, खजिनदार मनोहर भोमकर, सदस्य शाम भोमकर व अन्य शेतकऱयांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
भोम येथील धाडो नायनाडो संघटनेखाली शंभारहून अनेक शेतकरी आहेत. या शेतकऱयांना जमिनीच्या मशागतीसाठी तसेच कापणी व मळणीसाठी लागणारे यंत्र थेट शेतात नेण्यासाठी वाटेची अडचण आहे. ही सोय करण्यासाठी त्यांनी मंत्री गोविंद गावडे यांची भेट तसे निवेदन सादर केले. यंत्रामुळे शेतीची कामे सुलभ झाली तरी या शेतकऱयांना वाटे अभावी यंत्र थेट शेतात नेता येत नाही. शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याची समस्याही त्यांनी मांडली. त्यावर उपाय म्हणून यंत्र थेट शेतीत नेण्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱयांनी केली. मंत्री गोविंद गावडे यांनी शेतकऱयांच्या या मागणीवर चर्चा करुन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.