गौरी आवळे / सातारा :
सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूरू असलेला मटका व्यवसाय हा तरूणांना विळख्यात घेत आहे. काही महाविद्यालयीन तरूण हे महाविद्यालयाच्या नावाखाली मटक्याच्या अड्डयावर जाऊन आकडय़ांचे गणित शिकत आहेत. पालकांनी दिलेली पॉकेट मनी ही आकड्डयावर लावून पैसे दुप्पट होण्याची वाट पाहिली जात आहे. यामुळे पालकांचे दिवसेंदिवस होत चाललेले दुर्लक्ष हे मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे नेत आहे.
तरूण मुले हे देशाचे भविष्य आहेत. असे नेहमी ऐकायला मिळते. परंतु प्रत्यक्षात या तरूणांना देशाच्या भविष्याची काय पण स्वत:च्या भविष्याची ही चिंता राहिलेली नाही. वाढती बेरोजगारी ही कायम आहेत. याच्यासह दिवसेंदिवस तरूण वर्ग हा अवैधरित्या चालणाऱया व्यवसायाकडे वळत आहे. याचे मोठे उदाहरण सातारा शहरात बघायला मिळते. शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूरू असलेल्या मटक्या व्यवसायात तरूण मुले नकळत आपला सहभाग नोंदवत आहे. महाविद्यालयाच्या नावाखाली या मटक्याच्या अड्डयावर जावून आकडय़ांचे नवे गणित शिकत आहेत. तसेच प्रवासाला, इतर खर्चाच्या नावाखाली पालकांकडून देण्यात येणारी पॉकेटमनी या आकडय़ावर लावली जात आहे. पैसे डबल करून मनासारखी हौस करण्यावर तरूण भर देताना दिसत आहेत.
या मटका व्यवसायात मित्रांचा ही सहभाग वाढविला जात आहे. यातून व्यसनाकडे वाटचाल होत आहे. पैशातून दारू मटणाच्या पाटर्यानही ऊत येत आहे. मटक्याच्या पैशाचा हिशोब जुळला नाही तर भांडणे होवून जीवे मारण्याच्या घटना ही घडत आहेत. शिक्षणाच्या वयात अवैधरित्या चालणाऱया या व्यवसायातून तरूण गुन्हेगारीकडे वळत आहेत.
पालकांचे होतेय दुर्लक्ष
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले तर काही पालक हे नव्याने रोजगाराच्या शोधत आहेत. यातच मुलांच्या शिक्षण ते इतर खर्च यांचा मेळ घालण्यातच पालक व्यस्त आहेत. यामुळे आपला पाल्य हा महाविद्यालयाच्या नावाखाली कुठे जातो, काय करतो यांची माहिती पालक घेत नाहीत. महाविद्यालयात गेलेला आपला मुलगा हा जेव्हा गुन्हेगारीच्या कचाटय़ात सापडतो. तेव्हा पालकांना जाग येते.