प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानच्या दिंडी महोत्सवाची गणना गोव्यातील एका महत्वाच्या उत्सवात केली जाते. मडगावच्या दिंडी महोत्सवाला 1909 साली प्रारंभ झाला होता. त्यानंतर गोव्यात प्लेगची साथ आली होती व त्यामुळे 1910 साली दिंडी महोत्सव रद्द करावा लागला होता. आत्ता गोव्यात कोरोनाची साथ असल्याने यंदाचा दिंडी महोत्सव (पालखी मिरवणूक व गायनाच्या मैफली) रद्द करण्यात आला आहे. मात्र, पाजीफोंड-मडगाव येथील श्री हरिमंदिरात सर्व धार्मिक विधी होतील अशी माहिती देवस्थानचे सरचिटणीस मनोहर बोरकर यांनी दिली आहे.
दरवर्षी कार्तिक एकादशीला मडगावचा दिंडी महोत्सव भक्ती भावाने साजरा केला जात होता. त्यानिमित्त असंख्य भाविक मठग्राम नगरीला आवर्जुन भेट द्यायचे. यंदा दिंडी महोत्सवाला रविवार दि. 22 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असता व मुख्य दिंडी सोहळा शनिवार दि. 28 रोजी झाला असता. पण, कोरोना महामारीमुळे यंदा दिंडी महोत्सवातील पालखी मिरवणूक व नामवंत गायनांच्या मैफलीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र, देवस्थानात होणारे इतर सर्व धार्मिक विधी दरवर्षी प्रमाणेच होणार आहेत.
दिंडीच्या दिवशी भाविकांना मर्यादित स्वरूपात देव दर्शन
दिंडीच्या मुख्य दिवशी म्हणजे शनिवार दि. 28 रोजी भाविकांना विठ्ठल-रखुमाईचे दर्शन मर्यादित स्वरूपात करण्याचे नियोजन केले जाणार आहे. भाविकांनी गर्दी करू नये तसेच सामाजिक अंतर पाळावे. शक्य तो भाविकांनी दर्शन टाळावे, आपल्या घरातूनच विठ्ठल-रखुमाईचे नामस्मरण करणे उचित असल्याचे मत देखील मनोहर बोरकर यांनी व्यक्त केले आहे.
प्लेगमुळे 1910 साली जसा दिंडी महोत्सव एक वर्षापुरता रद्द करण्यात आला होता, तसाच आत्ता 110 वर्षांनी हा महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्याची पाळी देवस्थान समितीवर आलेली आहे. 1910 मध्ये प्लेग हा साथीचा रोग होता तर आत्ता 2020 मध्ये कोरोना हा सुद्धा साथीचाच रोग आहे. साथीचा रोग हा सुद्धा एक योगायोग आहे.
दरवर्षी कार्तिक एकादशीला विठ्ठल-रखुमाईची पालखी पाजीफोंड येथील श्री हरिमंदिरातून टाळ मृदंगाच्या गजरात कोंब वाडय़ावरील विठ्ठल मंदिरात नेली जाते. दुसऱया दिवशी पुन्हा सकाळी ही पालखी श्री हरिमंदिरात येते व नंतर धार्मिक विधी होतात व रात्री होणाऱया गायन मैफलीने दिंडी महोत्सवाची सांगता होत असे.
मडगावच्या दिंडी महोत्सवात दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांच्या गायनाच्या बैठका व्हायच्या, त्याच बरोबर दिंडी महोत्सवानिमित्त श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक मंडळा तर्फे दिंडी स्पर्धा तसेच आकाश कंदिल स्पर्धा घेतली जायची. सॉलीड पार्टी तर्फे रांगोळी स्पर्धा तसेच न्यू मार्केट परिसरात देखील कार्यक्रमाचे आयोजन व्हायचे. शिवाय कोंब वाडय़ावर देखील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात होते. ते यंदा रद्द करण्यात आलेले आहेत.
29 रोजी होणार विश्वस्त मंडळाची स्थापना
श्री हरिमंदिर देवस्थान तर्फे आत्ता विश्वस्त मंडळ स्थापन केले जात असून त्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. गेल्या रविवारी झालेल्या देवस्थानच्या समितीच्या सभेत हा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर समिती सदस्यांच्या सूचना असल्यास त्या रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी होणाऱया सर्व साधारण सभेत चर्चेत घेतल्या जातील व त्याच दिवशी विश्वस्त मंडळाच्या स्थापनेवर शिक्का मोर्तब होणार असल्याची माहिती सरचिटणीस मनोहर बोरकर यांनी दिली.