मंत्री निलेश काब्राल यांनी केले स्पष्टीकरण
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव – काणकोण राष्ट्रीय हमरस्ता डांबरीकरणाचे काम बंद अनास्थेमुळे किंवा कंत्राटदाराला पैसे न दिल्यामुळे बंद झालेले नसून कंत्राटदाराने हे काम अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी दिले आहे. मंत्री श्री. काब्राल यांनी या महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन मंत्री निलेश काब्राल यांनी काल बुधवारी या महामार्गाची पाहणी केली. हा रस्ता खराब झाल्याचे त्यांना आढळून आले. रस्त्यावर घातलेले डांबर बाजूला गेल्याने रस्ता खराब झाल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काब्राल म्हणाले, हे काम केंद्रीय मंत्रालयातून होत असून या कामाचे पैसे कधी अडवून ठेवले जात नाहीत. तरीही या कंत्राटदाराने हे काम अर्ध्यावरच सोडले. या कंत्राटदाराला आता काळय़ा यादीत टाकले जाणार असून लहान लहान टप्प्यात शॉर्ट टेंडर काढून हे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल.
काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी फातोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्यावर मोर्चा नेऊन रस्ता दुरूस्ती मागणी केली होती. तर दोन दिवसामागे पणजीत चक्क सार्वजनिक बांधकाम खात्याच्यात ठिय्या आंदोलन केले होते.