वृत्तसंस्था / रतलाम
मध्यप्रदेशातील रतलाम जिल्हय़ातील आंबा या गावी एका मुस्लीम कुटुंबातील सर्व 18 जणांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. या कुटुंबाचे प्रमुख मोहम्मद शाह यांनी आता रामसिंह हे नाव धारण केले आहे. आंबा येथील भीमनाथ मंदिरात त्यांचा हिंदू धर्म प्रवेशाचा सोहळा करण्यात आला. यावेळी गावकऱयांची मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती होती. गुरुवारी स्वामी आनंदगिरी महाराज यांच्या सानिध्यात त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्याची घोषणा करण्यात आली.
गेल्या पंधरा दिवसांतील मध्यप्रदेशातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. मोहम्मद शाह आणि त्यांच्या पत्नी, मुले व नातवंडे या साऱयांनी गोमूत्र स्नान करून तसेच मंत्रोच्चार आणि धार्मिक विधीच्या माध्यमातून हिंदू धर्माचा स्वीकार केला. हे कुटुंब शंभर वर्षांपूर्वी हिंदूच होते. तथापि, धर्मांतर झाल्याने त्यांनी मुस्लीम धर्माचे आचरण सुरू केले होते. आपला मूळ धर्म कोणता आहे, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंदू होण्याचा निर्धार केला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या धर्मप्रवेशाचा कार्यक्रम हिंदू संघटनांनी पार पाडल्याचे स्पष्ट करण्यात आले.
रितसर प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र सादर करून त्यांनी धर्म परिवर्तन केले. यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले. आपल्यावर कोणीही दबाव आणलेला नाही. तसेच कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. रामसिंह यांनी स्वतःच स्वामी आनंदगिरी यांच्याकडे जाऊन धर्म परिवर्तन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तेरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातीलच मंदसौर जिल्हय़ातील शेख जाफर शेख यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. त्यांचे नाव आता चेतनसिंह रजपूत असे ठेवण्यात आले आहे. त्यांची पत्नी हिंदू होती. तिच्यामुळेच आपल्याला हिंदू धर्माचे महत्त्व आणि श्रे÷त्व कळून चुकले. त्यामुळे आपण हिंदू धर्माचा स्वीकार करण्यास स्वेच्छेने तयार झालो, असे शेख यांनी धर्मांतरापूर्वी घोषित केले होते. त्यांनी मंदसौर येथील भगवान पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरात धर्म परिवर्तन केले होते. गुरुवारी धर्म परिवर्तन केलेले 55 वषीय रामसिंह यांचा जडीबुटी आणि औषधी वनस्पती विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे पुत्र मौसम शाह हे आता अरुणसिंह बनले आहेत. तसेच आणखी एक पुत्र शाहरुख शाह यांचे नाव संजयसिंह ठेवण्यात आले आहे. या मुलांच्या पत्नींनी तसेच कुटुंबातील इतर जवळच्या नातेवाईकांनीही हिंदू होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मध्यप्रदेशात अशा प्रकारची घरवापसी मोठय़ा प्रमाणावर होत आहे, असे विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.