अधिकारी-कर्मचाऱयांमध्ये धास्ती वाढली
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एका मागोमाग एक धक्के महापालिका प्रशासनाला बसत आहेत. अलीकडेच कोरोनामुळे स्वच्छता कामगार महिलेचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ एका स्वच्छता कंत्राटदाराचा मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे. एका अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल उपलब्ध झाल्याने महापालिकेत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असून शहरात सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये भीती पसरली आहे. सरकारी कार्यालयामध्ये आवश्यक खबरदारी घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याने काम कसे करायचे, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्यानंतर शिपायालाही लागण झाली होती. मुख्य कार्यालयातील गरिबी निर्मूलन विभागातील कर्मचाऱयाला लागण झाली होती. अलीकडेच महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया 52 वर्षीय स्वच्छता कामगार महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्या पाठोपाठ महापालिकेच्या स्वच्छता कंत्राटदाराचाही मृत्यू कोरोनामुळे झाल्याची चर्चा आहे. सदर 37 वषीय युवा कंत्राटदार गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने खासगी डॉक्टरकरवी घरीच उपचार घेत होते. मात्र, आजारपण वाढल्याने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
महापालिकेतील आणखी एका वरिष्ठ अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंगळवारी उपलब्ध झाली आहे. सदर अधिकारी महापालिकेच्या कायदा विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून गेल्या पाच महिन्यांपासून ते कोरोना डय़ुटीवर होते. परराज्यांमधून येणाऱया नागरिकांची माहिती घेणे, कोरोना रुग्णांच्या प्रथम संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे आदी जबाबदाऱया सोपविल्या होत्या. परराज्यांमधून येणाऱया नागरिकांची नोंदणी कुमार गंधर्व सभागृहात करण्यात येत होती. त्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी त्या अधिकाऱयांकडे सोपविण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून आजारी असल्याने सुटी घेतली होती. त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत असून काही मृत्यू होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये धास्ती वाढली आहे.