ऑनलाईन टीम / डोंबिवली :
मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ही घटना ताजी असतानाच आज म्हणजे दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे माजी विरोधीपक्ष नेते मंदार हळबे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप मंदार हळबे यांच्या संपर्क साधत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मंदार हळबेंना तातडीने ‘कृष्णकुंज’वर पाचारण करण्यात आले होते, परंतु हळबेंनी भाजप प्रवेश केल्याची बातमी आता समोर आली आहे.