– कायदेतज्ञ, तालीम संस्था प्रतिनिधींसोबत खासदार संभाजीराजे यांची बैठक
– शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
मराठा आरक्षण लढ्याचे सोमवार 24 रोजी कोल्हापुरातुन नव्याने रणशिंग फुंकले जाणार आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात खासदार संभाजीराजे छत्रपती कायदेतज्ञ, तालीम संस्थांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. बैठकीमध्ये आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे. सकाळी साडेदहा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयानंतर पुन्हा लढा उभारणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. न्यायालयीन लढ्याबाबत सरकाराने 27 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे. तत्पूर्वी ते कोल्हापुरातील प्रमुख तालीम संस्थांचे पदाधिकारी, कायदेतज्ञ यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोल्हापुरातील बैठक आटोपून संभाजीराजे नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन राज्याच्या दौऱयासाठी रवाना होणार आहेत. पुणे, औरंगाबाद, नाशिक येथील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱयांसोबत चर्चा करुन ते आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरवणार आहेत.
शौर्यपीठची आज जिल्हाव्यापी बैठक
मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा शौर्यपीठ तर्फे आज जिल्हाव्यापी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करणार आहेत. आझाद गल्ली विठ्ठल मंदिर परिसराताली जामदार मंडप येथे सकाळी पावणेबारा वाजता बैठकीस प्रारंभ होईल. बैठकीमध्ये मराठा समाजाला जे पर्यंत आरक्षण मिळतनाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती स्थगित करण्यात यावी. समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी. फीमधील फरक सरकारने राखीव निधीतून द्यावा. राज्य व केंद्र सरकारने आरक्षणप्रश्नी वेळीच लक्ष घालून घटनापीठाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आदी विविध मुद्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक प्रसाद जाधव यांनी दिली आहे.