इंग्रजी, उर्दू, कन्नड माध्यमांसाठी ‘चंदन’वर प्रसारण
प्रतिनिधी /बेंगळूर
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 1 जुलैपासून दररोज दूरदर्शनच्या टीव्ही चॅनेलवर पाठांचे प्रसारण करण्यात येणार आहे. इंग्रजी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीच्या टप्प्यात चंदन वाहिनीवर पाठांचे अध्यापन होईल. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी युटय़ूबवर पाठांचे व्हिडीओ उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यंदा 1 जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत चंदन टीव्ही चॅनेलवर पाठांचे व्हिडीओ प्रसारित केले जातील. ‘संवेद’ या नावाने हा कार्यक्रम इंग्रजी, कन्नड आणि उर्दू भाषेतून प्रसारित केला जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी युटय़ूबवर पाठांचे व्हिडीओ अपलोड केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱया लाटेसंबंधी नेमण्यात आलेली डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील समिती मंगळवारी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. या अहवालातील मुद्दय़ांचा विचार करून शालेय उपक्रमांविषयी आगामी दिवसांत योग्य निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करून वर्ग भरविण्याची उत्सुकता पालकांची असली तरी सर्व मुद्दय़ांचा साधकबाधक विचार करण्याची अनिवार्य परिस्थिती आहे. त्यामुळे डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या समितीचा अहवाल हाती आल्यानंतर यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.