ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक लागेबांधे आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. बिटकॉईनमध्ये तीन कोटी रुपये द्या, मलिकांना जामीन मिळवून देतो, अशी ऑफर फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्याची माहिती मलिकांचा मुलगा फराज मलिक यांनी दिली.
दरम्यान, फराज मलिक यांनी याप्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी इम्तियाज नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासात हा फोन दुबईतून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सुरुवातीला त्यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत होता. त्यानंतर मलिक यांना आर्थर रोड तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले होते. नवाब मलिक तुरुंगात गेल्यामुळे भाजपकडून सातत्याने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणला जात आहे. दरम्यान, मलिक यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली आहे. याच दरम्यान, दुबईतून मलिकांच्या जामिनासाठी फोन आल्याने खळबळ उडाली आहे.