किंमत 14 कोटी रुपये असल्याचे सरकरचे अनुमान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सक्तवसुली प्राधिकरणाने (ईडी) शुक्रवारी फ्रान्स या देशामध्ये विजय मल्ल्या याची 16 लाख पौंडाची (साधारणत: 14 कोटी रुपये) मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रींगविरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. विजय मल्ल्या चार वर्षांपूर्वी बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून विदेशात पळून गेला आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.
ईडीच्या विनंतीवरून फ्रान्स सरकारने पॅरिस येथील 32 ऍव्हेन्यू या विभागातील घर आणि रिकामी जागा जप्त केली. ही मालमत्ता मल्ल्याने आठ वर्षांपूर्वी खरेदी केली होती, असे सांगण्यात आले. किंगफिशर एअरलाईन्स लिमिटेड या मल्ल्याच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीच्या खात्यातून बेकायदेशीररीत्या रक्कम विदेशी पाठवून ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती, असा ईडीचा आरोप आहे. यासंबंधी मल्ल्यावर भारतात कारवाई होत आहे.
ब्रिटनमध्ये प्रयत्न सुरू
मल्ल्या याचे भारताला प्रत्यार्पण करावे, असा आदेश ब्रिटिश सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षापूर्वी दिला होता. तथापि, प्रत्यार्पणाचे पूर्ण अधिकार ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी अद्याप त्यांच्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कृती केलेली नाही. त्यामुळे भारत सरकारने त्यांच्याकडे मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याचा आग्रह धरला आहे. सीबीआयनेही ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न चालविले आहेत. लवकरच या प्रयत्नांना यश येईल, अशी आशा भारत सरकारने वेळोवेळी व्यक्त केली आहे.