ऑनलाईन टीम / प्रयागराज :
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला. अल्लापूरमधील बाघंबरी गद्दी मठाच्या खोलीत त्यांचा मृतदेह खांबावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी पोलिसांना 6 ते 7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या तरी महंतांनी आत्महत्या केल्याचे दिसत असले तरीही फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतरच महंतांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलीस महानिरीक्षक के. पी. सिंह यांनी म्हटले आहे.
सोमवारी महंत नरेंद्र गिरी वास्तव्यास असलेल्या अल्लापूरमधील बाघंबरी गद्दी मठाची खोली आतून बंद होती. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी महंत गिरी यांचा मृतदेह खांबावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. तसेच घटनास्थळी सापडलेल्या 6 ते 7 पानी सुसाईड नोटवरुन त्यांचे शिष्य आनंद गिरी, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
महंत नरेंद्र गिरी बऱयाच दिवसांपासून तणावाखाली होते, असे सांगण्यात येते. त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर हा वाद मिटला होता. दरम्यान, आज सकाळी 11.30 वाजता महंत नरेंद्र गिरी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.