नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात बांगलादेशच्या दौऱयावर जाऊ शकतात. कोविड-19 महामारीनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला विदेश दौरा असणार आहे. पण महामारीदरम्यान पंतप्रधानांनी आभासी माध्यमातून विविध द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय बैठकांमध्ये भाग घेतला होता. बांगलादेश दौऱयाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु तो 26 आणि 27 मार्च रोजी होऊ शकतो. पंतप्रधानांच्या दौऱयापूर्वी गृहसचिव अजय भल्ला ढाका येथे जाणार असून बांगलादेशचे गृहसचिव मुस्तफा कमालउद्दीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. विदेशमंत्री एस. जयशंकर हे 4 मार्च रोजी बांगलादेशात असणार आहेत. कोविड लसींच्या पुरवठय़ात भारताने बांगलादेशला प्राथमिकता दिली आहे. बांगलादेश सैन्याच्या तुकडीने यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेतला होता. भारतीय वायुदलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया हे बांगलादेशच्या तीन दिवसीय दौऱयावर आहेत.