प्रतिनिधी / सातारा :
आजपर्यंत आपण ग्रीन टी ऐकली आहे. पण आता पहिल्यांदाच ग्रीन राईस (हिरवा भात) चे उत्पादन सातारातील महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी येथे घेण्यात येत आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या ग्रीन राईसची पेरणी नुकतीच कृषि विभागातर्फे करण्यात आली आहे.
बिरवाडी येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतामध्ये एस.आर.टी (सगुणा राईस टेक्नीक) म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान या पध्दतीने गादी वाफ्यावर कृषी उपसंचालक साताराचे विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी वाई चंद्रकांत गोरड, तंत्र अधिकारी सातारा महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे, मंडल कृषि अधिकारी बुधावले, कृषी सहाय्यक विशाल सूर्यवंशी यांच्या हस्ते ग्रीन राईसची पेरणी करण्यात आली.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे कृषि सहाय्यक दिपक बोर्डे यांनी पारंपारिक पांढऱया भाताच्या जोडीला या ग्रीन राईचेचे वाण महाबळेश्वर येथील शेतकऱयांसाठी उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच या भाताची लागवड करण्यात येत आहे. ‘तिलकस्तुरी’ हे हिरव्या भाताचे वाण असुन ते 140 दिवसांमध्ये तयार होते. या भात पिकाची वाढ ही 125 सेंमी पर्यंत होते. तसेच वनस्पतीच्या पानांमध्ये असणाऱया हरितद्रव्य (क्लोरोफिल) मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. हेच पानांमध्ये असणारे हरितद्रव्य (क्लोरोफिल) भातांच्या दाबांमध्ये आढळते. त्यामुळे भाताचे दाणे हिरवे दिसतात. त्यामुळे याला हिरवा भात किंवा ग्रीन राईस म्हंटले जाते. तसेच या भाताची पौष्टिकता ही तितकीच अधिक आहे.
हिरव्या भाताचे आरग्यदायी फायदे :
96 टक्के फायबरचे प्रमाण यांत असून तसेच फॅट फ्री भात असल्याने आरोग्यासाठी अत्त्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सीडेटस, न्युट्रीयन्टस व व्हीटॅमिन्स विपुल प्रमाणात आढळतात. भारतामध्ये विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱया महत्वाच्या अशा प्रदर्शनामध्ये या भाताला 18 वेळा पारितोषिके मिळाली आहे.
लाल भाताचीही प्रथमच लागवड :
रेड राईस (लाल भाताची) लागवड ही यावेळी करण्यात आली हे 110 दिवसांचे लाल भाताचे वाण असुन यामध्ये ऍन्यासायनीनचे प्रमाण अधिक आहे. तसेच या भातामध्ये ही फॅटचे प्रमाण अत्त्यंत कमी आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच या भातात फायबरचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबर आयर्न, मॅग्नीज, व्हीटॅमिन्स ही असल्याने रक्तातील लाल पेशींची संख्या वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचेची निगा राखली जाते. या भातामध्ये ब्राऊनराईसपेक्षा अँटीऑक्सीटेंडचे प्रमाण 10 पट अधिक आहे. या रेड राईसमध्ये आवश्यक न्युट्रीयंटस्, आयर्न, व्हीटॅमिन्स, फॉस्फरस व फायबर यांनी समृध्द आहे. अशा या ग्रीन आणि रेड राईच्या नविन भाताच्या वाणांची लागवड बिरवडी येथे करण्यात आली आहे.