ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 351 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 3 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 14 हजार 067 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 142 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 14,067 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1499 पोलीस अधिकारी आणि 12,568 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 11 हजार 356 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1442 पोलीस अधिकारी आणि 10,214 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2569 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 342 पोलीस अधिकारी आणि 2227 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 142 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 पोलीस ऑफिसर आणि 127 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.