ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यासाठी सरकार कमी पडले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा या मागणीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
- जालन्यात राजेश टोपेंना घेराव
मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटवा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने पालकमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
- पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावाने काळ्या फिती बांधून सरकारच्याविरोधात घोषणा देत आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये न्यायालयाने दिलेली स्थगिती राज्याने तात्काळ उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- औरंगाबादेत ढोल बजाव
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.