ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये दाखल झाले. तेथील कार्यक्रमात महिला सबलिकरणाच्या मुद्दा अधोरेखित करत त्यांनी उत्तराखंडमध्ये आपची सत्ता आल्यास महिलांना दरमहा 1 हजार तर बेरोजगारांना 5 हजार रुपये देण्याची मोठी घोषणा केली.
केजरीवाल म्हणाले, उत्तराखंडमध्ये 10 वर्ष काँग्रेस आणि 10 वर्ष भाजपने राज्य केले. मात्र, दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला. उत्तराखंडमध्ये आपची सत्ता आल्यास आम्ही दिल्ली मॉडेल राबवू. हे फक्त आश्वासन नाही तर गॅरंटी देत आहे. आपचे सरकार येताच आम्ही राज्यात 6 नवे जिल्हे बनवू. तसेच दिल्लीप्रमाणे मोफत वीज, रोजगार देऊन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहू.
राज्यातील 18 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 1000 रुपये जमा करण्यात येतील. कुटुंबातील प्रत्येक महिलेला 1000 रुपये स्वतंत्रपणे मिळतील. कुटुंबात पाच महिला असतील तर पाचही जणींना त्याचा लाभ मिळेल. तसेच जोपर्यंत युवकांना नोकरी मिळणार नाही, तोपर्यंत 5000 रुपये दरमहा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.