लाहोर / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा माजी कर्णधार व सर्वाधिक सामने खेळलेला दिग्गज फलंदाज इंझमाम-उल-हकची येथील खासगी रुग्णालयात तातडीने अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. सोमवारी श्वास घेताना त्रास जाणवत असल्याने इंझमामला खासगी इस्पितळात दाखल केले गेले. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. लाहोरमधील प्रख्यात हृदय शस्त्रविशारद प्रो. अब्बास कझीम यांनी अँजिओप्लॅस्टी केली.
51 वर्षीय इंझमाम हकने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 120 कसोटी व 378 वनडे खेळले असून 2016 ते 2019 या कालावधीत पीसीबी निवड समितीचे अध्यक्षपदही भूषवले. इंझमाम अध्यक्षपदी कार्यरत असतानाच 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम लढतीत भारताला नमवत आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, 2019 च्या उत्तरार्धात पीसीबीच्या नव्या कार्यकारिणीने इंझमामला तातडीने पदावरुन पायउतार होण्याचे आदेश दिले होते. इंझमाम हकने 2016 टी-20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्वीट करत इंझमाम लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा नोंदवली.