ऑनलाईन टीम / कोपरगाव :
माजी मंत्री शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. आज पहाटे साडेचारच्या सुमारास कोपरगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4:30 वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
24 मार्च 1929 रोजी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे कोल्हे यांचा जन्म झाला होता. कोपरगाव तालुक्यात सहकारी आणि शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. येसगावचे सरपंच ते राज्याचे मंत्री या प्रवासात त्यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात अनेक पदावर यशस्वी रित्या काम केले. ते शिर्डीतील साईबाबा संस्थानचे 9 वर्ष उपाध्यक्ष होते.
कोल्हे 1972 मध्ये विधानसभेवर अपक्ष निवडून आले. त्यानंतर ते कोपरगाव विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पहिले. शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील आहेत. गोदावरी (खोरे) सहकारी दूध संस्था, यशवंत पोल्ट्री, देवयानी सहकारी बँक लि. कोपरगाव उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं.