सातारा / प्रतिनिधी :
भाऊ व मित्रासह उरमोडी धरणानजीकच्या एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या युवकाला जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील दहा हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात साताऱ्यातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी यातील तक्रारदार युवक सुरज बिभिषण मेहेर (वय 27, रा. करंजेपेठ, सातारा, मूळ रा. आंबी, ता. भूम) हा त्याचा भाऊ किरण व मित्र विशाल ननावरे यांच्यासह उरमोडीधरणानजीक असलेल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. सायंकाळी 6.30 च्या दरम्यान हॉटेल उरमोडीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करुन मेहेर हॉटेलमध्ये निघाला असताना तिथे सुमित प्रकाश शेटे (रा. करंजेपेठ, सातारा) व त्याच्यासह दोन अनोळखी युवक तिथे आले. यावेळी सुमित याने सूरज मेहेर याला जुन्या भांडणाचे कारण काढून मारहाण सुरु केली. त्याच्यासोबत असलेल्या अनोळखींनी देखील मारहाण केली. यावेळी सुमित शेटे याने खिशातून चाकू काढला व त्याचा धाक दाखवत सुरज मेहेर याच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेतले.
याबाबत मेहेर याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुमित शेटे याच्यासह दोन अनोळखींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप याप्रकरणी कोणास अटक करण्यात आलेली नव्हती. याबाबत हवालदार दीपक बर्गे अधिक तपास करत आहेत.