रॉकगार्डन परिसरात सापडली पर्स, चप्पल, मोबाईल, ओढणी : आपत्कालीन पथकाकडून समुद्रात शोधमोहीम
वार्ताहर / मालवण:
रेवतळे येथे कुटुंबियांसह वास्तव्यास असणारी काव्या कृष्णा माजिक (21, रा. मूळ रा. दोडामार्ग) ही विवाहिता बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास बेपत्ता झाली. रॉकगार्डन येथील समुद्र किनाऱयावर विवाहितेची पर्स, मोबाईल, ओढणी व एक चप्पल आढळून आले आहे. याबाबत कृष्णा माजिक यांनी काव्या बेपत्ता असल्याची खबर मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, काव्या ही रॉकगार्डन येथील खडकाळ भागात पाय घसरून पडली असावी, या शक्यतेने आपत्त्कालीन गुपच्या स्कुबा डायव्हर्सनी तिचा शोध घेतला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती सापडली नव्हती.
मालवण ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून सेवेत असलेले कृष्णा माजिक हे पत्नीसमवेत रेवतळे येथे भाडय़ाच्या खोलीत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा मेहुणा व भाऊही राहतो. बुधवारी सकाळी कृष्णा कामावर गेले असता, काही वेळाने त्यांच्या भावाने काव्या घरात नसल्याची माहिती त्यांना दिली.
पतीच्या मोबाईलवर मेसेज
कृष्णा यांनी काव्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा मोबाईल लागत नव्हता. याचवेळी कृष्णा यांनी काव्याने पाठविलेला मेसेज पाहिला. तिने कृष्णा यांना ‘हॅपी ऍनिव्हर्सरी’- ‘रॉकगार्डन’ अशा आशयाचा मेसेज पाठविला होता. त्यामुळे कृष्णा यांनी तात्काळ रॉकगार्डन परिसरात धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या मदतीने रॉकगार्डन परिसरात शोधाशोध केली असता, रॉकगार्डनच्या खडकाळ भागात काव्याची पर्स, मोबाईल, ओढणी, एक चप्पल आढळून आली. आजबाजूला शोधाशोध केली असता, काव्या कुठेही दिसून आली नाही.
आपत्कालीन ग्रुपद्वारे समुद्रात शोधमोहीम
दामोदार तोडणकर यांच्या आपत्त्कालीन ग्रुपने रॉकगार्डन येथील समुद्रात स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने दुपारपासून शोध मोहीम राबविली. समुद्रात उधाणसदृश स्थिती असून पाण्यास करंट असल्याने तीन तास सुरू असलेली शोधमोहीम दुपारी उशिरा थांबविण्यात आली. कृष्णा माजिक यांची पत्नी काव्या ही बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, आरोग्य सेवक, परिचारिका यांनी कृष्णा यांना धीर दिला. पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस तपास करत आहेत.