नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या गोटात सामील झालेले सिनेअभिनेते मिथून चक्रवर्ती यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. मिथून चक्रवर्ती यांना आता केंद्रीय राखीव पोलीस दल सुरक्षा देणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांवर होणाऱया हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चक्रवर्ती यांच्याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सहभागी असलेल्या सात जणांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सुरक्षा कवच पुरवण्यात येणार आहे. तसेच काही खासदारांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेंतर्गत संबंधितांना 11 कमांडोचे एक पथक सुरक्षा देणार आहे. याशिवाय 55 सुरक्षारक्षकांचीही एक टीम त्यांच्या निवासस्थानाजवळ तसेच ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असणार आहे.