वृत्तसंस्था/ मियामी
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा मेदवेदेव्ह आणि बेलारूसच्या आर्यना साबालेन्काला टॉप सिडींग देण्यात आले आहे.
मंगळवारपासून महिलांच्या स्पर्धेला प्रारंभ होत असून बुधवारपासून पुरूष एकेरीच्या सामन्यांना प्रारंभ होईल. सदर स्पर्धा हार्डकोर्टवर खेळविली जात आहे. स्पर्धा आयोजकांनी टॉप सीडेड मेदवेदेव्ह आणि साबालेन्का यांना पहिल्या फेरीत पुढे चाल दिली आहे. मेदवेदेव्हला गेल्या आठवडय़ात झालेल्या इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेत तिसऱया फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्याने एटीपीच्या मानांकनातील आपले अग्रस्थान गमविले आणि सर्बियाचा जोकोविचने पुन्हा पहिले स्थान पटकाविले. 26 वर्षीय मेदवेदेव्हने तीन आठवडे एटीपीतील अग्रस्थान स्वतःकडे राखले होते. गेल्यावर्षी या स्पर्धेत मेदवेदेव्हने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मेदवेदेव्हचाचा दुसऱया फेरीतील सामना ब्रिटनच्या अँडी मरेशी होणार आहे. 34 वर्षीय मरेने 2009 आणि 2013 साली मियामी स्पर्धा जिंकली होती.
महिलांच्या विभागात बेलारूसच्या साबालेन्काला पहिले स्थान, पोलंडच्या स्वायटेकला दुसरे स्थान, इस्टोनियाच्या कोंटावेटला तिसरे तर ग्रीसच्या सॅकेरीला चौथे स्थान देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड बार्टी या स्पर्धेत सहभागी होणार नाही. मात्र जपानची ओसाका, रूमानियाची हॅलेप, कॅनडाची फर्नांडिज यांच्यात चुरस राहील.