वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत वेटलिफ्टींग या सत्रात भारताला मीराबाई चानूकडून पदकाची अपेक्षा अधिक आहे. चानूच्या सरावाला यापूर्वी प्रारंभ झाला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी विदेशी प्रशिक्षण डॉ. हॉर्सचिग यांच्या मार्गदर्शनाखाली मीराबाई चानूचा सराव सुरू होणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने (साई) मीराबाई चानूच्या अमेरिका दौऱयाला हिरवा कंदील पाठविला आहे. चानूचा हा सराव जुलै महिन्यापर्यंत चालणार आहे.
मध्यंतरी मीराबाई चानूला खांद्याची दुखापत झाली होती. आता या दुखापतीवर अमेरिकेत तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते उपचार केले जाणार आहेत. मीराबाई चानूच्या अमेरिका दैऱयासाठी एकूण 70.8 लाख रूपयांचा खर्च केला जाणार असून साईने याला मंजुरी दिली आहे. भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे विदेशात भारतीय नागरिकांच्या हवाई प्रवासाला बंदी घालण्याची शक्यता आहे. काही देशांनी यापूर्वीच भारतीय प्रवाशांना आपल्या देशामध्ये संपूर्ण बंदी घातली आहे. मीराबाई चानूचे अमेरिकेत जवळपास तीन महिने वास्तव्य राहील. त्यानंतर ती अमेरिकेतून थेट ऑलिंपिक स्पर्धेसाठी टोकियोत दाखल होणार आहे. मीराबाई चानू रविवारी अमेरिकेला प्रयाण करणार आहे.