प्रतिनिधी/ कुंकळी
गोव्याचे सुपूत्र व मुंबईहून दोनदा निवडून आलेले आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचे अध्यक्ष दिलखुश देसाई यांच्याहस्ते फातर्पा येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळय़ाच्यावेळी गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, देवस्थानचे सचिव अजय देसाई, खजिनदार सुजय देसाई व मुखत्यार देवप्पा देसाई व उपाध्यक्ष खुशाली देसाई उपस्थित होते.
यावेळी आमदार फातर्पेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आम. फातर्पेकर म्हणाले आपण गोव्यात जन्मलो आणि काही परिस्थितीमुळे मुंबईत गेलो आणि मुंबई ही आपली कर्मभुमी झाली. असे असले तरी आपण आपल्या गोव्याकडे असलेले नाते तोडलेले नाही, ते म्हणाले.
व्यासपिठावर उपस्थित असलेल्या श्री. कवळेकर यांच्याकडे पाहात ते म्हणाले की एकदा आपण एकदा श्री. कवळेकर यांचे भाषण मुंबईत आयोजित केले तेव्हा त्यांनी आम. फातर्पेकर यांचेच भाषणात कौतुक केले. आम. फातर्पेकर यांचे गोव्यात कशा प्रकारे कार्य चालते याची माहिती मुंबईकरांना दिली तेव्हा मुंबईकरानाही आपल्या कामाची कल्पना आली आणि नंतर त्यांनीही आपली वाखाणणी केली. आपण आपल्याकडे येणारी व्यक्ती ही कोणत्या पक्षाकडे निष्ठा असलेली ते पाहात नसून पक्षविरहीतपणे जमेल ते साहाय्य करतो आणि आपण आपले हे कार्य चालूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री चंदकांत कवळेकर यांनी गोव्याचे सुपूत्र असलेले आम. फातर्पेकर हे मुंबईत दोनदा निवडून आले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि मुंबईत असूनही ते या देवस्थानला भरपूर साहाय्य करीत असल्याची कबुली दिली.
या देवस्थानच्या सौदर्यीकरणासाठीचा निधी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंजूर केलेला असून टप्प्याटप्प्याने या विकास कामांचा प्रारंभ होणार असल्याचे श्री. कवळेकर यानी यावेळी सांगितले.
सुरुवातीला सतिश शिरोडकर यांनी स्वागत तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर देवस्थानचे अध्यक्ष दिलखुश देसाई यांनी आभार मानले.