मुंबई/प्रतिनिधी
पालिकेच्या आरोग्य विभागात 30 टक्के पदे रिक्त असल्यामुळे सध्या कोविड-19च्या आपत्तीकाळातील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झाला असल्याचे प्रजा फाउंडेशनने सांगितले आहे. मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचायांची 60 पदे तर प्राथमिक आरोग्य सेवांमधील 30 टक्के पदे रिक्त असल्याचे `मुंबईताल आरोग्याची सद्यस्थिती’ या अहवालात प्रजा फाऊंडेशनने माहिती दिली.
पालिकेकडे पुरेश्या निधीची उपलब्धता असूनही पायाभूत संरचना दुर्लक्षित राहिलेली आहे. पालिकेच्या भांडवली खर्चाच्या बजेटचा वापर सातत्याने कमी राहिलेला असून 2018-19 मध्ये बजेटमध्ये तरतूद केलेल्या निधीपैकी 54 टक्के रक्कम वापरली नव्हती, तर हेच प्रमाण 2016-17 मध्ये 73टक्के इतके होते, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.
या अहवालात आरोग्य समितीवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. रूग्णालयांचे आणि आरोग्य केंद्रांचे नामकरण करण्याला महापालिकेच्या आरोग्य समितीने सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे अहवालात म्हटले आहे.