ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेच्या कोरोनाविरोधी लढय़ात महत्त्वाची भूमिका बजावणारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काकाणी यांना गुरुवारी ताप आला आणि अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पण झाले. त्यानंतर त्यांना अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दीड वर्षापूर्वी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून मुंबई महापालिकेचा कोरोनाशी लढा सुरू आहे. सुरेश काकाणी हें अगदी पहिल्या दिवसापासून या लढय़ात सामिल आहेत. तसेच महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्या नेतृत्वाखाली काकाणी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली असून मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रयत्न केले आहेत.
रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही, त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईकरांना ते मीडियाच्या माध्यमातून कायम करत होते. ते सतत रुग्णालयांच्या संपर्कात होते. इतरांना सूचना करताना ते स्वतः काळजी घेत होते. त्यांनी कोविड प्रतिबंधक लसही घेतली होती. त्यानंतरही त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशाशनाची चिंता वाढली आहे.