इस्लामाबाद / वृत्तसंस्था
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याला दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या दोन प्रकरणांमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 32 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय या दहशतवादी म्होरक्याला 3.40 लाख रुपयांचा (पाकिस्तानी चलन) दंडही भरावा लागणार आहे. त्याला आतापर्यंत एकूण सात प्रकरणांमध्ये 68 वर्षांची शिक्षा झाली आहे.
दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज अहम भुत्तर यांनी पंजाबमध्ये नोंदवलेल्या दोन प्रकरणांमध्ये शुक्रवारी सईदला शिक्षा सुनावण्यात आली. हे खटले काउंटर टेररिझम कोर्ट पंजाबच्या वतीने दाखल करण्यात आले होते. सईदला ठोठावण्यात आलेल्या दोन प्रकरणांपैकी पहिला खटला 2019 चा आहे. यामध्ये त्याला 15.5 वर्षांची शिक्षा झाली. तर दुसरे प्रकरण वर्षभरापूर्वीचे म्हणजे 2021 चे आहे. यामध्ये त्याला 16.5 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. दोन्ही शिक्षा एकाचवेळी चालतील.
कोर्टाच्या आदेशानुसार सईदला लाहोरच्या कोट लखपत तुरुंगातून आणण्यात आले. 2019 पासून तो येथे तुरुंगात असल्याचे सईदच्या वकिलाने सांगितले. तथापि, सईदवर सध्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय नजर ठेवते आणि तो तुरुंगात न राहता त्याच्या घरी राहत असल्याचा संशयही व्यक्त केला जातो. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून सईद कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर दिसलेला नाही. अमेरिकेने त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. तो 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता.