प्रतिनिधी /वास्को
मुरगावच्या उपनगराध्यक्षपदी अखेर नगरसेवक अमेय चोपडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सोमवारी उपनगराध्यक्षपदासाठी केवळ अमेय चोपडेकर यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे मुरगावच्या उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर करण्याची औपचारीकताच बाकी राहिली होती.
मंगळवारी सकाळी मुरगावचा उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निर्वाचन अधिकाऱयांनी चोपडेकर यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. ही निवड जाहीर होताच मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. अमेय चोपडेकर हे विद्यमान पालिका मंडळातील दुसरे उपनगराध्यक्ष आहेत.