प्रतिनिधी / वास्को
मुरगावच्या भावी नगराध्यक्षपदी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचे समर्थक नगरसेवक दामू कासकर यांची निवड जवळजवळ निश्चित झालेली आहे. भाजपाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलेला असून उपनगराध्यक्षपदी देविता आरोलकर यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या गुरूवारी सकाळी मुरगावचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. बऱयाच नगरसेवकांमध्ये नाराजी दिसत आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची माळ दामू कासकर यांच्याच गळय़ात पडण्याची शक्यता आहे.
मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडीबद्दल स्थानिक पातळीवर नगरसेवकांना विश्वासात घेऊन काल मंगळवारी संध्याकाळपर्यंत कोणतीही बैठक झाली नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नावर भाजपाच्या वरीष्ठ पातळीवरच्या नेत्यांमध्ये सल्लामसलत झालेली आहे. त्यांनी मुरगावच्या नगराध्यक्षपदी आणि उपनगराध्यक्षपदी कोण असावा याबाबत अंतीम निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. मात्र, या विषयाचा कोणताही गाजावाजा करण्यात आलेला नाही. बऱयाच नगरसेवकांना आपले नगराध्यक्ष कोण असतील याचा थांगपत्ता नव्हता. मात्र, काही नगरसेवकांपर्यंत ही माहिती पोहोचलेली असून दुसऱयांदा नगरसेवक बनलेले दामू कासकर यांची मुरगावच्या नगराध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झालेली आहे. उपनगराध्यक्षपदी देविता आरोलकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष निवडण्यात नगरविकासमंत्री मिलिंद नाईक बाजी मारणार
नगराध्यक्षपदासाठी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी आपले समर्थक नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स यांच्या नावाला प्राधान्य दिले होते. आमदार कार्लुस आल्मेदा समर्थक नगरसेवक यतीन कामुर्लेकरसुध्दा नगराध्यक्षपदासाठी उत्सुक होते. तर आमदार आल्मेदा यांच्याच गटातील नगरसेवक दीपक नाईक हे आपल्यापरीने नगराध्यक्षपदासाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांनी यापूर्वी दोन वेळा बराच काळ नगराध्यक्षपद भुषवीलेले असल्याने पक्षाने त्यांचा नावाचा विचार केला नाही. आमदार कार्लुस आल्मेदा व त्यांच्या इतर समर्थक नगरसेवकांना नगराध्यक्ष बनण्याची संधी दुसऱयांना निवडून आलेले नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स याना मिळेल असे वाटत होते. मात्र, आमदार कार्लुस आल्मेदा व त्यांच्या नगरसेवकांची अपेक्षा जवळजवळ फोल ठरलेली आहे. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी पालिका मंडळाच्या स्थापनेत बाजी मारल्याचे दिसत आहे.
मुरगावच्या प्रश्नावर मंगळवारी रात्री उशिरा पणजीत नेत्यांसमवेत बैठक
मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी निश्चित कोणाची वणीं लागेल याची पुसटशी माहिती अवघ्याच काही नगरसेवकांना लागलेली आहे. इतर मात्र, अनभिन्नच आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत या प्रश्नांवर नगरसेवकांबरोबर अधिकृत चर्चा झाली नव्हती. मात्र, उपलब्ध माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा मुरगावच्या प्रश्नावर पणजीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला मुरगावच्या भाजपासमर्थक सर्व नगरसेवकांना बोलावण्यात आले होते. संबंधीत आमदारही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीबाबत कोणता निर्णय झाला, दामू कासकरच नगराध्यक्ष होणार की अन्य कोणी, नेत्यांचे मन वळवीण्यासाठी नाराज नगरसेवकांना यश आले की नाही, नगरसेवकांना नेत्यांनी निश्चित कोणता उपदेश केला याबाबत माहिती मिळू शकली नाही. उद्या नवीन नगराध्यक्ष निवडण्यात येणार असून आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा दिवस आहे.