खेडमधील घटना : दुर्दैवी घटनेने मने सुन्न
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरानजिक असलेल्या खेड, ता. सातारा येथे स्वतःच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वडील श्रीधर अनंत भंडारे (वय 72) यांना अटक करण्यात आली आहे. व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. रोजी 21 रात्री 10 ते दि. 22 रोजी 7.20 दरम्यान खेड, ता. सातारा येथील राजेंद्र वामन पवार यांच्या जुन्या घराच्या अंगणात तेथीलच गणेश उर्फ किरण श्रीधर भंडारे (वय 40) आणि याचे वडील श्रीधर अनंत भंडारे यांच्यात रात्री भांडण झाले. त्यामध्ये श्रीधर भंडारे यांच्याकडून गणेश उर्फ किरण भंडारे याच्या डोक्याला व डाव्या पायाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण झाल्याने तो निपचीत पडला.
दरम्यान गणेश उर्फ किरण भंडारे यांचा चुलत भाऊ अनिकेत सुभाष भंडारे (वय 27, रा. खेड, ता. सातारा) हा घरात गेला असता त्याला घरामध्ये ठिकठिकाणी रक्त सांडलेले दिसले. तसेच लाकडी दांडके व त्याचा तुटलेला छोटा तुकडा दिसून आला. यावेळी तिथे निपचीत पडलेल्या गणेश उर्फ किरण भंडारे याला अनिकेत भंडारे आणि आणि त्याचे चुलत भाऊ निखिल भंडारे, संतोष भंडारे या तिघांनी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी अनिकेत भंडारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर श्रीधर अनंत भंडारे यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.